पर्यावरण आणि समाज व्यवस्थापन

जलस्वराज्य -२ कार्यक्रमाच्या अंमलबजावणी साठी पर्यावरण व्यवस्थापन व समाज व्यवस्थापन कार्यप्रणाली हे महत्वाचे घटक आहेत.

पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली

  • जलस्वराज्य-२ कार्यकमांतर्गत येणार्‍या सर्व योजनांसाठी तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेपूर्वी सविस्तर प्रकल्प अह्ववालाबरोबर पर्यावरण तपासणीसूची भरली जाणार आहे.
  • पर्यावरण तपासणी सुची तपासल्यानंतर ज्या योजनांचा पर्यावरणावर आघात होण्याची शक्यता असेल त्या योजनांसाठी पर्यावरण सुयोग्य प्रतिबंधात्मक आराखड्यानुसार कृती केल्या जाणार आहेत.
  • जलस्वराज्य-2 कार्यकमांतर्गत पाण्याचे उद्भवाचे संरक्षण, पर्यावरणाबाबत महत्वपूर्ण क्षेत्राची सुरक्षा, मानवी हस्तक्षेपापासून भूजलाचे संरक्षण, ज्या कृतींमुळे सागरी क्षेत्र, पाणथळ, पर्यावरणाच्या दृष्टिने संवेदनशील क्षेत्रात प्रतिकूल प्रभाव पडु शकतो, अशा बाबी प्रस्तावित करता येणार नाहीत तसेच पर्यावरणावर उच्च जोखीम असणाऱ्या ठिकाणी कार्यमांतर्गत भौतिक गुंतवणूक करता येणार नाही.

जलस्वराज्य-2 कार्यकमांतर्गत गुंतवणूकीतील घटकांचा पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करणे व कार्यक्रमांची अंमलबजावणी सुलभ व्हावी यासाठी पर्यावरण व्यवस्थापन मार्गदर्शिका तयार करण्यात आली आहे. या मार्गदर्शिकेत कार्यक्रमामध्ये घ्यावयाच्या कृती, पर्यावरण या घटकांवर लक्ष देण्याविषयी गरज, पर्यावरण व्यवस्थापनाची प्रक्रिया व या प्रक्रियेचे बळकटीकरण, पर्यावरण तपासणीसूची, पर्यावरण सुयोग्य प्रतिबंधात्मक आराखडा व त्याचे निराकरण (निवारण) योजना निश्चित करण्याची क्रमबध्द प्रक्रिया, सक्षम पर्यावरण व्यवस्थापना संबंधीचे नियम व प्रक्रिया यांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक संस्थांची क्षमता बांधणी इ. बाबींचा पर्यावरण व्यवस्थापन मार्गदर्शिकेत अंतर्भाव केलेला आहे.

समाज व्यवस्थापन

एखादया कार्यक्रमाची उभारणी व दीर्घकाळपर्यंत कार्यक्षम रहाण्याची त्या कार्यक्रमाची क्षमता या दोन्ही गोष्टी सत्यतेत उतरवायच्या असतील तर लोकसहभाग अनिवार्य आहे. गावाच्या माध्यमातून गावाला विकसित करणे म्हणजे समाज व्यवस्थापन करणे होय. जलस्वराज्य २ कार्यक्रमांतर्गत नियोजनापासून, अंमलबजावणी, व्यवस्थापन, सामाजिक लेखापरीक्षण व कार्यक्रमातील सुविधा शाश्वत टिकण्यासाठी भविष्यकालीन नियोजन व देखभाल दुरूस्ती पर्यंत सक्रीय सहभागाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. पाणी पुरवठा व स्वच्छतेची समस्या सोडवायची असेल तर गावातील स्थानिक परिस्थिती व उपलब्ध जलस्त्रोत याचे ज्ञान असणे आवश्यक आहे यासाठी स्थानिक ग्रामस्थांचा योजनेत सहभाग महत्वाचा आहे. पाण्याच्या स्वच्छतेसह गावात जनजागृती कार्यक्रम राबविणे, लोकांची क्षमता बांधणी, पाणी स्त्रोत प्रदूषणरहीत ठेवणे, सांडपाण्याचे सुरक्षित व्यवस्थापन, घनकचर्‍याचे व्यवस्थापन करणे याच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग हा महत्वाचा घटक आहे. समाजामध्ये सहभागाची भावना तयार करणे यामध्ये पाणी आणि सांडपाणी कार्यक्रमाच्या नियोजन टप्प्यापासून ते देखभाल दुरुस्तीपर्यंत गावातील सर्वांचा सक्रीय सहभाग राहील.

जलस्वराज्य २ कार्यक्रम हा प्रामुख्याने सामाजिक-पर्यावरणीय-तांत्रिक-आर्थिक या घटकांवर अवलंबून आहे. समाज व्यवस्थापन घटकाची सहा महत्वाची तत्वे जसे सर्वसमावेशकता, लोकसहभाग, पारदर्शकता, सामजिक उत्तरदायीत्व, आर्थिक जबाबदारी, जमिनीची उपलब्धता ही आहेत. समाज व्यवस्थापन घटकाचे काम समाज व्यवस्थापन कृती आराखड्यानुसार जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या सूचनेनुसार व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) यांच्या मार्गदर्शनाने समाज विकास तज्ञ व सहाय्यकारी संस्था यांच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या सहभागाने केले जाईल.