माहिती, शिक्षण व संवाद उपक्रम

जलस्वराज्य कार्यक्रमात जनसंपर्क मोहीम राबविणे हे प्रमुख ध्येय आहे. परिणामकारकरित्या संवाद मोहीम राबविणे हे जलस्वराज्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एक महत्वाचा घटक राहील. स्वच्छ पिण्याचे पाणी, पाण्याची गुणवत्ता, जलधर पाणी व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन समाजाचे आरोग्य यांच्यातील परस्परातील संबंधाविषयी समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठी लोकशिक्षण मोहीम हाती घेण्यात येईल. याद्वारे पाणी पुरवठा व सांडपाणी व्यवस्था यासाठी स्थापन केलेल्या सुविधांचा वापर, देखभाल रक्षण आणि टिकविणे याविषयी समाजाचा दृष्टीकोन बदलता येईल. जनसंपर्कातील प्रमुख साधनांचा जसे वैयक्तिक भेटी, परस्परातील सुसंवाद, समूह भेटी, चर्चासत्रे, पथनाट्य कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, छापील साहित्य, छायाचित्र, गावातील मेळावे, जागृती फेरी, लोककलेच्या माध्यमातून प्रबोधन, प्रवचन, चित्ररथ याद्वारे जबाबदारीची जाणीव करून देता येईल.

माहिती शिक्षण संवाद मोहिमेचे उद्दीष्ट -

  • समाजामध्ये पाणीपुरवठ्याच्या स्वच्छतेसह पाणी स्त्रोत प्रदूषणरहित ठेवणे, सांडपाण्याची सुरक्षित व्यवस्थापन याबाबत गावात जागृती कार्यक्रम राबविणे.
  • समाजामध्ये सहभागाची भावना तयार करणे. यामध्ये पाणी आणि सांडपाणी कार्यक्रमाच्या नियोजन टप्प्यापासून ते अंमलात आणण्यापर्यंत सर्वांचा सहभाग राहील.
  • योग्य आणि किफायतशीर, स्वस्त आणि चांगल्या तंत्रज्ञानाचा स्वच्छतेसाठी वापर करणे.
  • सुरक्षित पिण्याचे पाणी गोळा करणे, साठवणे आणि त्यांचा योग्य वापर यांची माहिती मिळणे.
  • ग्रामपंचायतीच्या विकासात जास्तीत जास्त सहभाग घेणे, वैयक्तिक स्वच्छता आणि परिसर स्वच्छता यामुळे पर्यावरणाचा समतोल राखणे आणि यासाठी उचित नियोजन करणे.